हॅलोविन

हॅलोविन हा सण माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. हा सण दरवर्षी ३१ ऑक्टोबरला साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया मिळतात आणि पोशाख घालता येतात. शेजारच्या मित्रांसोबत आम्ही ‘ट्रिक ऑर ट्रीट’ साठी फिरतो आणि जास्तीत जास्त टॉफी आणि चॉकलेट गोळा करण्याचा आनंद घेतो. हा एक अतिशय मजेदार सण आहे, आणि मला दरवर्षी या उत्सवाची खूप उत्सुकता असते.

प्रत्येक वर्षी, आम्ही मोठे भोपळे (पंपकिन्स) आणतो आणि कुटुंबातील सर्व सदस्य मिळून त्यावर कलाकुसर करतात. भोपळ्यांना आम्ही डोळे, नाक आणि तोंड कोरून एक चेहरा तयार करतो. भोपळ्यावर कोरलेले चेहरे पाहणे खूप रोमांचक वाटते, आणि जेव्हा त्यामध्ये प्रकाश टाकतो, तेव्हा त्याचा उजळलेला चेहरा पाहून खूप आनंद होतो. भोपळ्यांसोबत आम्ही हॅलोविनच्या विविध मूर्ती आणि सजावट ठेवतो, त्यामुळे संपूर्ण घर आणि अंगण हॅलोविनच्या वातावरणाने भारलेले असते.

दरवर्षी, मी हॅलोविनसाठी एक नवा पोशाख विकत घेतो. यावर्षी मी बॅटमॅनचा पोशाख घ्यायचे ठरवले आहे. हॅलोविनसाठी खास दुकानं उघडली जातात, जिथे नवीन कपडे आणि सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. भीतीदायक मुखवटे, भूतांचे पोशाख, शैतान आणि जादूगारिणीचे वेष, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजांची उपकरणे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी असतात.

आम्ही शाळेतही हॅलोविन साजरा करतो. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसह आम्ही सर्व जण हॅलोविनसाठी खास वेष परिधान करतो आणि फोटो काढतो. संपूर्ण शाळा सणाच्या आनंदाने भारलेली असते. संध्याकाळी, आम्ही शेजाऱ्यांकडे जाऊन टॉफ्या आणि चॉकलेट गोळा करतो. आमच्या टॉफींची टोपली पूर्ण भरते आणि त्या आम्हाला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ पुरतात! मला स्निकर्स (Snickers) खूप आवडतात आणि मी नेहमी त्या सगळ्यात आधी संपवतो.

माझ्या शेजारच्या एका घराने त्यांचे अंगण भीतीदायक भूत आणि शैतानांनी सजवले आहे. रात्री, जेव्हा कोणीही त्या घराजवळ जातो, तेव्हा भीतीदायक आवाज करणाऱ्या मूर्ती अचानक वाजू लागतात! त्या घरात चांगली प्रकाशयोजना केलेली असते, आणि तिथला प्रकाश आणि आवाज कुणालाही घाबरवू शकतो. लोकांना घाबरवण्यासाठी मांजर, घुबड, जादूगारिणी, भुते आणि शैतानांचे अनेक वेगवेगळे देखावे (प्रॉप्स) वापरले जातात. पण जेव्हा कोणी त्या घराच्या दारात जाऊन टकटक करतो, तेव्हा तिथले रहिवासी त्यांना कँडी देतात.

हॅलोविन दरम्यान, आंबट कँडीसारख्या काही खास प्रकारच्या कँड्या विक्रीसाठी असतात. मी त्यापैकी फक्त एक-दोनच चाखतो. हॅलोविन हा नेहमीच एक मजेदार, रंगीबेरंगी आणि आनंददायक सण असतो!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिमवर्षाव

स्कूल बस - school bus