मेरीमूर पार्क
मी पाच वर्षांचा असताना मेरीमूर पार्कला गेलो आणि घसरगुंडीवर खेळलो. मी चक्रावर बसण्याच्या खेळणीवर (सिट आणि स्पिन) गोल गोल फिरण्याचा आनंद घेतला आणि झोका खेळण्यात खूप वेळ घालवला. माझे वडील तेथील उपकरनांवर व्यायाम करत होते आणि तेथे हायस्कूलचे विद्यार्थी फुटबॉल/सॉकर खेळत होते. मला वाटते की ही शाळांमधील स्पर्धा होती. तेथे अनेक टेनिस कोर्ट देखील होते आणि मी माझ्या पहिल्या भेटीतच उद्यानाच्या प्रेमात पडलो.
आज, मी माझ्या वडिलांसोबत आमच्या सायकलवरून उद्यानाला पुन्हा भेट दिली. वडिलांनी मला संपूर्ण परिसर फिरवण्याचे वचन दिले, आणि आम्ही लोखंडी पुलावरून (आयर्न ब्रिज वरून) आलो. हा आमचा नेहमीचा मार्ग नाही. आम्ही पुलावर थांबलो आणि पक्षी पाहत नदीच्या सौंदर्याचा आनंद घेतला. पूल ओलांडताना आम्हाला अनेक बेसबॉल कोर्ट आणि खेळाचे मैदान दिसले, पण मी आज खेळलो नाही. माझ्या लक्षात आले की सर्व सहा फुटबॉल कोर्टवर इलेक्ट्रिक बल्ब बसवले आहेत.
मला आठवले की आईने आम्हाला आमच्या बागेची तपासणी करण्यास सांगितले होते. तिने आमच्यासाठी एक छोटी जमीन भाड्याने घेतली होती, तिथे आमचे टोमॅटो चांगले वाढले होते. जे अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहतात आणि स्वतःची बाग विकसित करू इच्छितात त्यांच्यासाठी हा एक उपयुक्त पर्याय आहे. आम्ही एक मोठी पवनचक्कीही पाहिली, पण ती चालू नव्हती.
उद्यानातल्या क्रिकेटच्या मैदानात माझ्या वडिलांचे मित्र खेळत होते. ते आपल्या मित्रांशी थोडा वेळ बोलले आणि आम्ही पुढे निघालो. वडिलांच्या मित्रांनी सांगितले कि पुढच्या महिन्यात उद्यानात सर्कस येणार आहे आणि त्यासाठी तंबू बांधण्याचे काम चालू आहे. मी माझ्या वडिलांना सांगितले की मी सर्कस नक्की बघेन.
वॉशिंग्टन मधला एकमेव वेलोड्रोम देखील या उद्यानात आहे. आम्ही थोडावेळ ट्रॅकवर सायकल चालवली, आणि तो एक मनोरंजक अनुभव होता. मी माझ्या वडिलांना सांगितले की मला बाइक रेस बघायला आवडेल आणि त्यांनी मला घेऊन जाण्याचे वचन दिले.
पुढे, आम्ही रॉक क्लाइंबिंग क्षेत्र शोधले. मी माझी सायकल पार्क करून रॉक क्लाइंबिंग सुरू केले. हे सोपे नव्हते, परंतु मला ते आवडले. माझ्या वडिलांनी पुढच्या वेळी परत येथे येऊ असे म्हणत रॉक क्लाइंबिंग थांबवण्याचा इशारा केला पण मला तेथून जावेसे वाटत नव्हते.
अलीकडे, मी माझ्या आई सोबत पार्कला भेट दिली आणि तिने मला रॉक क्लाइंबिंगला मदत केली. आम्ही काही छोटी हेलिकॉप्टर पाहिली आणि मी त्यांच्या जवळ गेलो. बरेच लोक रिमोट-नियंत्रित मिनी विमान उडवत होते आणि काही ड्रोन देखील उडवत होते. अशा छंदांसाठी (फ्लायर्ससाठी) एक क्लब आहे ( https://www.mar-c.org ). माझ्या आईने सांगितले की मी हि असा छंद ठेऊ शकतो आणि मला घरी जाण्यास सांगितले. यावेळी आम्ही पूर्वेकडील प्रवेशद्वारातून बाहेर पडलॊ. येथे अनेक रग्बी मैदाने आणि ऑफ-लीश डॉग एरिया आहेत. मला हे उद्यान खूप आवडते आणि मी जेव्हाही भेट देतो तेव्हा ते सोडणे माझ्यासाठी कठीण जाते.
उन्हळ्यात येथे ओपन-एअर थिएटरमध्ये चित्रपट दाखवतात, हा एक मनोरंजक अनुभव आहे. थंड हवामानात तारांकित आकाशाखाली चित्रपट पाहणे मजेशीर असते. एकदा ए.आर.रहमानची मैफल इथे झाली होती आणि इतर अनेक मैफिली येथे होतात.
आजकाल, आम्ही बऱ्याचदा उद्यानात जातो आणि माझे बाबा प्रवेशाचे तिकीट काढण्यासाठी एक डॉलरचे बिल वापरण्यास विसरत नाहीत. मला ते बिल भरण्यात आणि प्रवेशाचे तिकीट गोळा करण्यात आनंद होतो.
मेरीमूर पार्कची देखभाल करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे आणि त्यांना हे उद्यान खूप आवडते. ते येथे विकासकामे करतात. मेरीमूर या डेअरी फार्म चालवणाऱ्या भावांच्या मुलीच्या स्मरणार्थ हे उद्यान तयार करण्यात आले आहे. हे रेडमंडमधील खूप मोठे उद्यान आहे आणि वसंत ऋतूमध्ये ते खूप रंगीत असते. पार्कमध्ये चालणे, संगीत मैफिली, सायकलिंग, साहसी खेळ, पाळीव प्राण्यांसाठी धावण्याची जागा, हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांसारख्या अनेक क्रियाकलाप आहेत. तुम्ही कधी रेडमंडला भेट दिलीत तर या पार्कला भेट द्यायला विसरू नका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा