समामीश नदी काठ ची पायवाट (समामिश लेक ट्रेल)

समामिश सरोवराभोवती 10 मैलांची पायवाट आहे. विमलने आज तलावाभोवती सायकल चालवायची असे ठरवले. मेरीमूर पार्क उत्तरेस आहे आणि आंतरराज्य 5 (I-5) तलावाच्या दक्षिणेस आहे. या लांब अंडाकृती तलावाभोवती सायकलिंग करता येते.

विमलने तलावाच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या आपल्या घरापासून सायकल सफर सुरू केली. सम्मामिश तलावाचा पश्चिम भाग स्वतंत्र आणि सुंदर घरांनी भरलेला आहे. ही घरे रस्त्याच्या उतारावर वसलेली आहेत. जर तुम्ही तलावाच्या काठाजवळून रस्त्यांकडे पाहिलं, तर तुम्हाला फक्त घरांची छप्परं दिसतील! रस्ते उंचीवर असल्यामुळे तिथून दृश्य स्पष्ट दिसतं, तर घरे जणू खोल दरीत दडलेली असल्यासारखी वाटतात

तलावाच्या चारही बाजूंनी एक सायकल ट्रॅक आहे आणि विमल त्या मार्गावर सायकल चालवत होता. रस्त्यावर चढाव असल्याने सायकल चालवताना तो जोरात श्वास घेत होता. लवकरच तो वासा पार्क जवळ पोहोचला. वासा पार्क हे एक खासगी उद्यान आहे, आणि तिथे सायकल चालवण्यासाठी फक्त एका बाजूला ट्रॅक आहे, त्यामुळे वेगाने जाणाऱ्या वाहनांसमोर सायकल चालवणे कठीण होते. तिथे काही नैसर्गिक सौंदर्य नव्हते, त्यामुळे विमलला तो परिसर कंटाळवाणा वाटत होता. तो वारंवार आपली गती आणि आतापर्यंत पार केलेले अंतर तपासत होता.

त्या रस्त्यावर एक छोटेसे दुकान होते, ज्याला कदाचित सुविधा स्टोअर म्हणता येईल. तिथे विमलने गरम कॉफी घेतली. थंडगार वाऱ्याने त्याला ताजेतवाने वाटले. थोडा वेळ तिथे थांबल्यानंतर त्याने पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली आणि रशियन स्कूल पार करत तो इस्साक्वा भागात पोहोचला.

त्यानंतर त्याने I-90 महामार्गाच्या बाजूने सायकल चालवली. तो मार्ग उताराचा असल्याने फारसे पॅडल मारावे लागत नव्हते. सायकल इतकी वेगाने चालली की ती जणू मोटरसायकलप्रमाणे वाटत होती! वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी विमलने ब्रेक दाबले. I-90 वर गाड्या वेगाने धावत होत्या, आणि विमललाही असे वाटत होते की तोही त्यांच्या गतीने जात आहे. त्याच्या चेहऱ्यावर येणारा गार वारा खूप सुखद वाटत होता. कॉस्टको पासून पुढे रस्ता सपाट होता, त्यामुळे विमल अगदी आरामात सायकल चालवत गेला. मात्र, त्याला रहदारीच्या रस्त्यावरून जावे लागले आणि अनेक सिग्नल्स पार करत तो शेवटी ईस्टलेक रोडला पोहोचला.

ईस्टलेक रोड हा एक नवीन मार्ग होता, आणि तिथे फक्त पादचारी आणि सायकलस्वारांना परवानगी होती. काही सायकलस्वार आणि थोडेसे लोक पायी जात होते. विमलने आनंदाने एक गाणं गुणगुणलं आणि थंड वाऱ्याचा आस्वाद घेत सायकल चालवली. मात्र, तिथे एका ठिकाणी काम सुरू असल्याने एका फलकावर डायव्हर्जनचा (वळणाचा) बोर्ड लावलेला होता. त्यामुळे त्याने मार्ग बदलला आणि आता तो मोठ्या वाहनांसोबत सायकल चालवत होता. पुन्हा एकदा उतार आला आणि त्याने सहज तो उतार पार केला. अशा लांब सायकल सफरीमध्ये उतार हे एक प्रकारचे आरामस्थानच असते—ते घाम आणि थकवा दोन्ही कमी करतात!

डायव्हर्जन संपल्यानंतर तो पुन्हा ईस्टलेक रोडवर आला. तिथे बरेच लोक चालत होते, काही जण स्कूटरवरून जात होते. जवळच एक छोटंसं पार्क होतं, जिथे विमलने थोडा वेळ विश्रांती घेतली. काही लोक तिथे मासेमारी करत होते, तर काही मुले तलावात पोहत होती. काही लोकांनी बार्बेक्यूवर मासोळी शिजवून खत होते. काही जण वॉटर स्कूटरवरून तलावामध्ये फिरत होते, तर काही जण मोठ्या बोटी चालवत होते. तिथे खूप गोंधळ होता, पण वातावरण मात्र उत्साहाने भरलेलं होतं. तलाव हे एक उत्तम मनोरंजनाचं ठिकाण होतं आणि इथे येणाऱ्या लोकांना भरपूर आनंद मिळत होता. "सम्मामिश" ही त्या भागात पूर्वी राहणाऱ्या एका जमातीचं नाव होतं, म्हणून त्या झीलचं नाव "सम्मामिश झील" पडलं.

थोडा वेळ तिथे विश्रांती घेतल्यानंतर विमलने पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली. तो मेरीमूर पार्कपर्यंत सायकल चालवत गेला आणि त्याने १० मैलांची सायकल सफर पूर्ण केली! गार वारा आणि सोपा मार्ग यामुळे हा अनुभव खूपच अविस्मरणीय झाला. त्याने मनात विचार केला, "१ तास ३० मिनिटांत १० मैल पार करणं काही वाईट डील नाही!" त्याला ही सफर पूर्ण करून खूप आनंद आणि समाधान वाटलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिमवर्षाव

हॅलोविन

स्कूल बस - school bus