माऊंट रेनिअर वरचा सूर्योदय

सूर्योदय पाहण्यासाठी आम्ही पहाटे तीनच्या सुमारास डोंगर चढायला सुरवात केली। या ट्रिप साठी फक्त तीन तासांची झोप मिळेल, अंधारी वाट, आणि सिएटलच्या थंड वातावरणात उंच डोंगर चढावा लागेल असे कळले तेव्हा मी खूप घाबरलो. पण मित्रांबरोबर ट्रेक करण्याची आणि अविस्मरणीय सूर्योदय पाहण्याची संधी मला गमवायची नव्हती म्हणून मी राजी झालो. काही मित्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन येणार होते, तर काही जण फक्त त्यांच्या मुलांना आणणार होते. घरापासून पायथ्यापर्यंतचा प्रवास सुमारे अडीच तासांचा होता. मध्यरात्री घरापासून सुरुवात करून पहाटे ३ वाजता आम्ही सर्व पायथ्याशी पोहोचलो. या प्रवासात आमची रात्रीची झोपच उडाली. ठरल्याप्रमाणे आम्ही मध्यरात्री दोन गाड्यांनी प्रवास सुरू केला आणि २४ तास चालणारे कॉफी शॉप शोधू लागलो. रात्रभर जागे राहण्यासाठी आम्ही गप्पा-गोष्टी करत होतो. असा रात्रभर प्रवास करणे माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता. 

पाठीमागच्या गाडयांच्ये दूरचे मंद दिवे डोळ्यांना झपकी देत होते, तर समोरचा लांब आणि वळणदार रिकामा रस्ता आम्हाला तंद्रीतून जागा ठेवत होता. अधून मधून गाडी जेव्हा चुकीच्या लेन मध्ये जात असे तेव्हा गाडी लेन चेतावणीचा इशारा देत आम्हाला सावधान करत असे. शहरातील घनदाट घरांच्या ऐवजी जेव्हा उपनगरातली विरळ आणि मोठी घरे दिसू लागली तेव्हा संकेत मिळाला कि आपण शहराच्या हद्दी बाहेर पोहोचलो आहोत. या तीन तासांच्या प्रवासा मध्ये मी पूर्णपणे जागा राहिलो. मुलं अधूनमधून झोपली, कधी बेडवर तर कधी त्यांच्या कार सीटवर. 

"राष्ट्रीय वन आपले स्वागत करत आहे" या पाटीने आमचे स्वागत केले. माउंट रेनियर नॅशनल पार्क मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश तिकीटाची आवश्यकता असते. सुदैवाने आम्ही $३० भरून पास विकत घेतले होते. कुठल्या पार्क साठी कोणते प्रवेश तिकीट लागते हे गोंधळात टाकणारे आहे. डिस्कवरी पार्क, नॉर्थवेस्ट पार्क, आणि माऊंट रेनियर पार्क या सर्व ठिकाणी वेगवेगळे प्रवेश पासांची आवश्यकता आहे. 

लांब आणि वळणदार रस्ता नैसर्गिक सौन्दर्यानी सजलेला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तेथे कित्तेक गाड्या उभ्या होत्या आणि लोक पहाटेच्या निसर्गाचा आनंद लुटत होते. आम्ही पहाटे ३ वाजता सनराईज व्हिजिटर सेंटरला पोहोचलो. तेथे पार्क करणारी आमची पहिली गाडी होती. ६,४०० फूटांच्या चढाई नंतरचा प्रवास हा पायीच करायचा होता. 

आम्ही भव्य पांढऱ्या माऊंट रेनियरच्या पायथ्याशी उभे असताना एक मंद, थंड वाऱ्याची झुळूक आम्हाला अलगद स्पर्श करत होती. आकाश तेजस्वी ताऱ्यानी चमकत होते. आम्ही थंडी पासून वाचण्यासाठी हातमोजे, टोप्या, आणि स्नोजॅकेट घालून पुढच्या प्रवासासाठी तैयार झालो. एव्हडी तैयारी करूनही पूर्ण शरीरावर खूप थंडी जाणवत होती. एका मागून एक आम्ही सर्व शिखरावर पोहोचलो. तेथे जय ने सर्वांसाठी गरमागरम "मल्लि" (कोथिंबीर पावडर युक्त कॉफी) बनवली. आम्ही सर्वानी जय ला धन्यवाद व्यक्त केले. 

दूरवर काही ट्रेकर्सच्या हेडलॅम्प्सचा छोटासा प्रकाश दिसत होता. तो प्रकाश बघून आम्ही सगळे हर्षित झालो. पूर्वेकडील आकाशातल्या एका तेजस्वी तार्याने किंवा ग्रहाने आमचे लक्ष वेधले. काहींनी ते विमान असल्याचा अंदाज लावला तर काहींना वाटत होते कि तो तारा आहे. तर काहींनी त्याला ग्रह समजून सकाळचा तारा म्हणून संबोधले. ताऱ्यांनी आकाश भरले होते. जणू एक रोमांचकारी संगीतमय देखावा शोभून आल्या सारखे जाणवत होते.

काही प्रवासी तेथे रात्रभर कॅम्पमध्ये राहिले होते. त्यांनी आम्हाला हळुवारपणे बोलण्यास विनंती केली किंवा त्यांच्या पासून दूर थांबण्यास सांगितले कारण आमच्या आवाजामुळे त्यांना झोप लागत नव्हती. तेव्हा आम्हाला समजले येथे काही लोक झोपलेले आहेत. आम्ही मुलांना हळुवारपणे बोलण्यास सांगितले आणि पुढचा प्रवास चालू ठेवला. निवडीसाठी अनेक मार्ग होते. त्यातील आम्ही फ्रॅमोंट लुकआऊट ची निवड केली. दगड वाळूच्या या खडबडीत रस्त्यावर चांदण्या रात्रीत चालण्यासाठी फ्लॅशलाईट आणि हेडलॅम्प वापरणे गरजेचे होते. त्याशिवाय आम्हाला दोन फुटाहून पुढचे दिसत नव्हते. उंच पर्वत, लहान झुडुपे, आणि जमिनीवरच्या लतां मुळे हे दृश्य मनमोहक वाटत होते. झाडे नसलेले काही डोंगर आणि थंडगार वारा एक अनोखा अनुभव देत होता. लोक सुव्यवस्थित पद्धतीने फिरत होते, जसे की मुंग्या हातात दिवे घेऊन टेकड्यांवर रांगेत चालत आहेत. गडद अंधार आणि दिव्यांच्या बारीक प्रकाशामुळे एक अनोखे वातावरण तैयार झाले होते. 

आम्ही निवडलेला रस्ता एक-मार्गी होता, ज्याच्या एका बाजुला खोल दरी होती. ती दरी बघून आम्हाला ट्रेकच्या संभाव्य धोक्याची जाणीव झाली.  अंधारातही डोंगर सुंदर आणि तेजस्वी दिसत होता. आमच्या डोळ्यांनी जे अविस्मरणीय सुंदर दृश्य पाहिले त्याचे रूप कॅमेर्यात टिपणे अशक्य आहे.  

बर्फवृष्टी, खडकाळ रस्ते, आणि वाळूच्या पायवाटीने आम्ही दोन तास चालत गेलो. हा ट्रेक दीड मैलाचा म्हटलं तरी तो आम्हाला खूप लांबचा वाटला. अखेरीस, आमची १,२०० फूट उंचीवर ५.६ मैलांची राऊंडट्रिप ट्रेक झाली. जसजसा वेळ निघून गेला, अंधाराने निरोप घेतला आणि आम्ही आमचे दिवे बंद केले. अंधार आणि प्रकाशाच्या विविध छटा आहते. आपले डोळे या छटांशी जुळवून घेऊन आपल्याला दिसायला मदत करतात. भव्य खोल दरी, उंच शुभ्र माऊंट रेनियर चे पहाड, आणि खडकाळ रस्त्यावर चालण्याच्या मंद आवाजाने आमचे मन ध्यान अवस्थेसारखे शांत झाले. या निसर्गरम्य वातावरणात आमच्या शरीर आणि मनात हलकेपणा जाणऊ लागला. पालकांनी आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन अभिमानाने निसर्ग बघण्याचा आनंद लुटला. 

कॅसकेडिया पर्वत आणि माऊंट ऍडम्स आमच्या समोर होते. पर्वत शिखरांच्या मागे सूर्योदय दिसू लागला आणि सूर्यप्रकाशाने शेकडो शिखरे प्रकाशित झाली. आमचे कॅमेरे काही सीमाच्या पुढची विशालता पकडायला संघर्ष करत होते. पर्वत, दर्या, एक सुंदर हिरवे वन, आणि मध्ये असलेला बर्फानी भरलेला माऊंट रेनियर पाहून आमचे डोळे आनंदानी भरून आले. शिखरावर, आम्ही ज्या रस्त्यानं आलो त्यापासून दूरवर, आम्ही एक शानदार दरी बघितली, जी हिरवळीने भरली होती. आजूबाजूच्या पर्वत आणि ढगांनी हे दृश्य  सुशोभित केले होते. अशा शोभनीय परिसरात, सूर्य हळुवारपणे आपले भव्य रूप दाखवत वर आला. हि अविस्मरणीय सुंदरता आम्ही कॅमेरा मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न समुद्राचे पाणी हातात धरण्या सारखे होते. निसर्गाचे सार टिपण्याची आमची ईच्छा अनंत होती. पर्वत, ढग, आणि निसर्गातील सर्व घटकांसह सेल्फी आम्हाला उत्साहित करत होते. पहाटेने आपल्या नेहमीच्या भव्यतेत नृत्य केले आणि आम्ही त्या क्षणाची वाट पाहात होतो जेव्हा माऊंट रेनियर सूर्य किरणांनी लाल होईल. दुर्दैवाने, ढगांनी आमच्या दृश्यात अडथळा आणला, परंतु आम्ही इतर पर्वत शिखरांवर लाल प्रतिबिंबाची झलक पाहिली. 

आम्ही आणलेल्या बेरी आणि नाष्ट्याचा आनंद घेण्यासाठी विश्रांती नंतर आणि थोड्या वेळ बर्फात खेळून आम्ही उतरण्यास सुरुवात केली. अंधारात आम्ही ज्या वाटेने चाललो होतो, सूर्यप्रकाश तिचं सौन्दर्य प्रकट करत होतं. निसर्गाच्या सौंदर्याच्या सर्वोत्तम क्षणांची आठवण करून देणारी प्रत्येक जागा फोटोची संधी होती. गोठलेल्या बर्फाने सुमारे तीन फूट जमीन झाकली होती, अर्धा गोठलेला तलाव आणि काही अंतरावर एक लहान तलाव, सुंदर जंगली फुले, खडकाळ वाटा, उपटलेली झाडे, वळणदार मार्ग आणि रस्त्यांवरून बाहुल्यांसारखे फिरणारे लोक. एवढं सुंदर दृश्य होतं की अशी जागा सोडायला कुणाचंही मन तैयार होणार नाही.

आमचे पाय आणि गुडघे थकले असले तरी आमची मानसिक ऊर्जा शाबूत होती. काही प्रेमळ वाटकाऱ्यानी आम्हाला गुळाचा चहा दिला, जो थंड वातावरणात अमृतासारखा शरीरात ऊर्जा निर्माण करतो. लहान मुलांनी या अनुभवाचा मनापासून आनंद घेतला. निखळ आनंदाचे ते काही तास आयुष्यभराच्या आठवणी म्हणून जपले जातील. या आनंदात आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. माउंट रेनियरच्या प्रवेशद्वाराजवळ शेकडो वाहने पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. सुदैवाने, सकाळी लवकर पोहोचल्यामुळे आमचे लांब रांगेत वाट पहाणे टळले. पण झोपेच्या कमतरतेमुळे अंगात थकवा जाणवत होता. तो घालवण्यासाठी मी स्टारबक्सची कॉफी प्यालो आणि या अनोख्या अनुभवाबद्दल गप्पा मारत आनंदात घरी पोहोचलो.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिमवर्षाव

हॅलोविन

स्कूल बस - school bus