आगगाडीचा प्रवास (ट्रेन चा प्रवास)

ट्रेन (आगगाडी) चा प्रवास नेहमीच खूप मनोरंजक असतो. प्रवास करताना आपण खिडक्यांमधून सर्व काही पाहू शकतो. आपण चालत्या ट्रेनमध्ये फिरू शकतो, चांगले अन्न आणि स्नॅक्स खाऊ शकतो, खेळ खेळू शकतो आणि संभाषण हि करू शकतो. एकूणच, तो एक आनंददायी अनुभव असतो.

मी सिएटल ते पोर्टलँड असा प्रवास केला आहे. आम्ही वेळेवर स्टेशनवर पोहोचलो, रांगेत उभे राहिलो आणि आमची तिकिटे तपासून घेतली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आमचा कोच आणि जागा ठरऊन दिल्या, आणि आमचे सामान नीट ठेवले. तिकीट कंडक्टरचा गणवेश सुन्दर होता. सर्व औपचारिकता पूर्ण करून आम्ही आगगाडीत चढलो.

रेल्वे स्थानकात एक वेगळाच सुगंध दरवळत असतो. रेल्वे चे समांतर ट्रॅक कधी जुळून येतात तर कधी वेगळे होतात, हे पाहून आश्चर्य वाटते. हे दृश्य पाहायला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात काही भिंतींवरचे भिंतीचित्र दिसले, असे दृश्य माझ्यासाठी नवीन होते. गाडी गावातून जात असताना तेथील मुले गाडीकडे वळून टाटा करायची. मी हि त्यांना टाटा केला पण त्यांनी मला पाहिले कि नाही याची मला खात्री नाही. 

आमच्या ट्रेनमध्ये एक निरीक्षण कक्ष होता जिथून आम्ही निसर्गरम्य सौंदर्य बघू शकत होतो. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. दुसऱ्या कोचमध्ये स्नॅक बार होता जिथे अन्न आणि गरम चहा कॉफी विकायला होती.

प्रत्येक स्टेशन जवळ आल्यावर स्टेशनचे नाव आणि त्या शहराची माहिती जाहीर केली जात असे. स्टेशनवर गाडी थांबली कि गाडीतले प्रवासी खाली उतरत आणि नवीन प्रवासी गाडीत चढत होते. प्रत्येक स्टेशनचे वेगळे स्वरूप पाहण्यात मनोरंजन होत असे.

मला यूएसए पेक्षा भारतात ट्रेनने प्रवास करणे जास्त आवडते. बऱ्याच वेळा, मी रात्रीच्या गाड्यांमध्ये प्रवास केला आहे ज्यामध्ये लांबलचक सीटवर ताणून झोपण्याची व्यवस्था असते. ट्रेनची लयबद्ध हालचाल, कू कू कू शिट्टी, जुन्या पंख्याचा आवाज आणि एकूणच ट्रेन प्रवासाचा अनुभव मंत्रमुग्ध करणारा असतो. विक्रेते ट्रेन चालू असताना आतमधून खाद्यपदार्थ आणि पेये विकतात आणि गाडी स्टेशनवर आल्यानंतर खिडकीतून हि विकतात.

ट्रेन वेग घेत असताना दरवाज्यातून येणारे वाहते वारे तोंडावर घेण्याचा आनंद रोमांचकारी आणि थरारक असतो. असा प्रवास करणे धोक्याचे आहे म्हणून मी दरवाज्याजवळ आई किंवा बाबां बरोबरच जातो. ट्रेन जेव्हा डोंगरातून जाते, समुद्र काठावरुन जाते, आणि बोगद्यातून जाते, तेव्हा खूप  मनोरंजक वाटते. 

अमेरिकेत एका किनारपट्टीहून दुसऱ्या किनारपट्टी पर्यंत जाणारे कित्तेक रेल्वे मार्ग आहेत. जसे कि, सिएटल ते लॉस एंजलिस, शिकागो ते सिएटल, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, ग्रँड क्यानियन, आणि इतर काही. हे मार्ग निसर्गरम्य आहेत आणि ट्रेनमध्ये बसून ते पाहणे हा एक सुखद अनुभव आहे.

शहराच्या हद्दीत प्रवास करण्यासाठीही ट्रेन आहेत, जसे कि मोनो-रेल आणि मेट्रो ट्रेन. या ट्रेन शहरातील एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी त्वरित जाण्यास सुविधाजनक असतात. मोनोरेल एकाच ट्रॅकवर धावते. जवळजवळ सगळ्या मोनोरेल स्वयंचलित असतात आणि सलग ये जा करत असतात. मोनोरेल चे ट्रॅक रस्त्यावरच्या पुलांवर बांधलेले असतात. मी मोनोरेल ने प्रवास करून शहरातल्या वहातुकीची कोंडी टाळली आहे. रोज प्रवास करणाऱ्याना मोनोरेल शाळा किंवा ऑफिस ला जाण्यासाठी खूप सोईस्कर आहे. काही ठिकाणी ती भुयारी मार्गानेही जाते. शहरात प्रवास करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. या मार्गाने प्रवास करताना माझे बाहेरच्या दृषयांवर लक्ष्य नसते कारण माझे पूर्ण लक्ष्य कुठल्या स्टेशनवर उतरायचे या वर असते.

ट्रॅम हळू धावतात आणि त्यांचा ट्रॅक कार व ट्रकच्या रस्त्याला लागून असतो. ट्रॅमला एक घंटा असते आणि त्यांच्या मार्गावर फक्त काहीच थांबे असतात. ट्रॅमचा प्रवास खूप मनोरंजक असतो आणि मला त्यात प्रवास करायला आवडते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिमवर्षाव

हॅलोविन

डब्बा पार्टी - Potluck